तू, तिची पत्रिका पाहिली होतीस का रे ?
पत्रिका म्हणजे आलं का लक्षात काय ते ?
जन्मपत्रिका अरे !
सांग ना ! पाहिली होतीस का ?
तिचा रचियता तूच, मग तू पाहणारचं ना रे !
बरं सांगायचा मूळ मुद्दा असा,
की जसं तिला नावरुप, लौकिक मिळतोय ना,
तो गजब आहे रे !
तिचं भाग्य थोर असावं,
म्हणून तर मी तिच्या पत्रिकेचा उल्लेख केला !
तुझ्या नावाचं इतकं मोठ्ठं व्यासपीठ मिळालंय ना तिला की काही विचारु नकोस !
नशीब काढलं रे तिने खरंच !
बरं तुला आठवतं ?
तू आणि मी समुद्रकिनारी फिरायला गेलो होतो !
हसू नकोस हं !
विचारतेय ते हो की नाही तेवढंच सांग !
तीही होती आपल्याबरोबर,
तुझ्या डायरीत दडली होती ती !
अजूनही ती तिथेच असते..!
तिथेच तर राहते ती....असो !
ऐक, तू ना तेव्हा वाळूत बराच वेळ रेघा मारत होतास,
मग काय आठवलं तुला काय माहित,
अन् माझं नाव लिहू लागलास त्या ओल्या वाळूत...!
अजूनही माझं नाव,
त्या ओल्या वाळूत लिहायला आवडत तुला !
शुभाशुभ काय असतं ते माहित नाही रे मला,
पण मी आपल्या पहिल्या रात्री,
रमल विद्या शिकले !
कशी माहितेय ?
तुझ्या रुपात खूप गहिरा,
खोल अथांग समुद्र होता माझ्याजवळ त्या रात्री !
अगदी त्याच्या किनाऱ्यालगत ओली वाळूही होती !
बस मग काय !
तुझ्या आत प्रवेश करायचाच होता मला,
त्याआधीच तुझ्या पाठीवरल्या ओल्या वाळूत,
मी माझं नाव लिहून घेतलं !
आणि चक्क रमल विद्येने कमाल केली रे...!
बघता-बघता भविष्य उलगडले,
माझ्या हक्काचं व्यासपीठ मिळाले रे मला !
तुझ्या तिला मिळालं ना तस्सं अगदी !
ती पाठ, जी आजही माझी आहे !
त्यावर मी माझे नावलौकिक मिळवतेय,
भरभरून स्तुती ऐकतेय माझीच !
फक्त तुझ्या तिला एकच निरोप दे माझा,
म्हणाव व्यासपीठ गाजवायला रचना महत्त्वाची नसतेच !
लागतो तो केवळ उत्स्फूर्त प्रतिसाद,
जो तुला माझ्याकडून मिळतो ऋषी !
#Shilpa____